'डी-गँगमधून बोलतोय'; माजी नगराध्यक्षांना १० कोटींची खंडणी मागणारे दोघे जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:41 PM2019-12-04T13:41:11+5:302019-12-04T13:44:22+5:30

वैजापूरच्या संचेती कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

The duo demanded a ransom of Rs 10 crore from the former vaijapur mayor are arresrted | 'डी-गँगमधून बोलतोय'; माजी नगराध्यक्षांना १० कोटींची खंडणी मागणारे दोघे जण ताब्यात

'डी-गँगमधून बोलतोय'; माजी नगराध्यक्षांना १० कोटींची खंडणी मागणारे दोघे जण ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपाच दिवसांनंतर छडा

वैजापूर : येथील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनीअटक केली. यातील एक जण शहरात मोबाईल शॉपी चालविणारा आहे, तर दुसरा वैजापूरजवळील रोटेगाव येथील रहिवासी आहे. या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील पाच दिवसांपासून संपूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी अजय मोहनसिंग राजपूत (२६, रा.  परदेशीगल्ली, वैजापूर) व राजू ऊर्फ जयराम बागूल (३५, रा. रोटेगाव, ता. वैजापूर) या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. 
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा मर्चंटस् बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांना २६ नोव्हेंबर रोजी मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा एक कॉल आला. अज्ञात व्यक्तीने संचेती यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर तुमच्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संचेती कुटुंबातील   सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. २७ नोव्हेंबर रोजी या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. 

मात्र, पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. २८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी शहरातील परदेशी गल्लीतील अजय मोहनसिंग राजपूत व रोटेगाव येथील राजू बागूल या दोघांना  चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तब्बल तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. काल सोमवारी या दोघांनी पोलिसांसमोर तोंड उघडले. आपणच १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी संचेती परिवारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली अजय राजपूत याने दिली. याप्रकरणी अजय राजपूत व राजू बागूल या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना वैजापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

मास्टर माइंड अजय राजपूतच 
या प्रकरणात अजय राजपूत हाच मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. धमकी देण्यासाठी व खंडणी मागण्यासाठी राजेंद्र बागूलचा मोबाईल हॅण्डसेट वापरण्यात आला होता. अजय हा जुगार-मटक्यामध्ये २२ लाख रुपये हरल्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. हरलेल्या पैशाच्या भरपाईसाठी अजयने हा खंडणी उकळण्याचा कट रचला होता. 

सहा सीमकार्डांचा वापर
स्टेशन रस्त्यावरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याशेजारी अजय राजपूत याची आर्यन मोबाईल शॉपी आहे. अजयला मोबाईलचे बरेच तंत्रज्ञान अवगत आहे. त्याने व्हॉईस चेंजरबरोबरच व्हॉटस्अ‍ॅपसारख्या सोशल साईटचाही वापर केला. पोलिसांना मोबाईलचे लोकेशन हे सतत परदेशी गल्लीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व लक्ष्मी चित्रपटगृहाजवळच मिळत होते. 

तत्पूर्वी झाला चतुर्भुज
१२ डिसेंबर रोजी अजय हा विवाह बंधनात अडकणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला खंडणी मागणे व जिवे मारण्याची धमकी देणे, या प्रकरणात बेड्या ठोकल्या. पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणतीही पातळी गाठू शकतो, हे या खंडणी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. 

२७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत
अजयने २६ नोव्हेंबर रोजी संचेती यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती. त्याने संचेती यांना २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर संचेती यांच्या निवासस्थानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त  होता. मोबाईलचे दुकान संचेती यांच्या आॅफिससमोरच असल्याने अजय व राजू हे दोघे जण बाळासाहेब संचेती यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे जण सतत पोलीस ठाण्यासमोर चकराही मारत असत. या प्रकरणात आरोपींना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या घटनेचे वाईट वाटले
अनपेक्षितपणे मोबाईलवर खंडणी मागणारा फोन आला. त्यामुळे आमच्या कुटुंबावर भीतीची छाया पसरली. पोलिसांनी अथक परिश्रम घेत चार दिवसांतच आरोपीला गजाआड केले. वैजापुरात सर्व जाती-धर्माच्या लोकांसोबत आपले स्नेहाचे संबंध आहेत. आरोपींनी हा पवित्रा का उचलला, याचे वाईट वाटले. यापूर्वी त्यांच्यासोबत आपला कसलाही संबंध आला नव्हता. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.
- बाळासाहेब संचेती

गुप्तता पाळल्याने आरोपींपर्यंत पोहोचता आले
वैजापूर येथील व्यावसायिकाला डी-गँगच्या नावाने कॉल करून खंडणी मागणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर सेल आणि पारंपरिक तपासाची उत्तम सांगड घातल्याने हायप्रोफाईल गुन्ह्याचा उलगडा करण्यात आम्हाला यश आले. या प्रकरणाचा तपास करताना गुप्तता पाळण्यात आल्याने आरोपीपर्यंत पोहोचता आले. खंडणी मागण्यासाठी आरोपी राजपूतला चोरीचा मोबाईल देणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले. 
 -मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

पोलिसांना कळवावे
वैजापूरच्या व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणारे कॉल आले. यानंतर सर्वप्रथम तक्रारदार कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, वैजापूर पोलीस ठाणे आणि सायबर क्राईम सेल यांनी संयुक्त कारवाई करून आरोपींना पकडले. अशा प्रकारे खंडणीचे कॉल आल्यानंतर न घाबरता तात्काळ पोलिसांना कळवावे. 
-गणेश गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

Web Title: The duo demanded a ransom of Rs 10 crore from the former vaijapur mayor are arresrted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.