येऊरच्या खदाणीत साठलेल्या पाण्यात रहिवाशाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:32 IST2019-04-18T19:31:27+5:302019-04-18T19:32:38+5:30
त्यांनी आत्महत्या की पोहताना बुडून त्यांचा मृत्यू झाला या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

येऊरच्या खदाणीत साठलेल्या पाण्यात रहिवाशाचा बुडून मृत्यू
ठाणे - येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील हवाई दलाच्या केंद्राजवळील खदाणीत साठलेल्या पाण्यात गुरुवारी गोपाळ तांडेल (50) यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तांडेल यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या की पोहताना बुडून त्यांचा मृत्यू झाला या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमान्य नगर भागात राहणारे तांडेल हे बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते. ते घरी परतलेच नाही. गुरुवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या खदाणीमध्ये एक मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्याआधारे ठाणे अग्निशमन दल आणि पोलिसांनी या खदाणीमधून तांडेल यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तांडेल हे खदाणीत पोहण्यासाठी उतरले असावेत त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले.