सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी आरोपी मनीषा माने मुसळे हिला वळसंगकर (स्पीन) रुग्णालयात नेले. तिथे गेल्यावर डॉक्टर आणि तिच्या शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट करण्यात आला. यासाठी पोलिसांनी रुग्णालयात मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मनीषाचा संगणक जप्त केला; तत्पूर्वी तिच्याकडून लॉगिन करून घेतले. फक्त १५ मिनिटांच्या चौकशीसाठी पोलिसांनी सलग आठ तास ठिय्या मांडला होता.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला गुरुवार, २४ एप्रिल रोजी आणखी गती मिळाली. सदर बझार पोलिसांच्या तपास पथकाने गुरुवारी सायंकाळी आरोपीला वळसंगकर रुग्णालयात नेले. तिथे तिने ई-मेल करण्यासाठी वापरलेल्या संगणकाची तपासणी केली. यासाठी आरोपीला ईमेल लॉगिन आयडी व पासवर्ड टाकायला लावला. यावेळी पोलिसांनी आरोपी मनीषासह डॉक्टरांचे पुत्र अश्विन, पत्नी, कन्या अन् सुनेचीही चौकशी केल्याचे सांगण्यात आले.
तोंड लपवून आलीचौकशी झाल्यानंतर पोलिसांनी मनीषाला पुन्हा पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. आधी रुग्णालयात अरेरावी करणारी आज रात्री तोंड लपवून आली. तिच्या वाईट कृतीमुळे डॉ. वळसंगकर यांच्यासारख्या देवमाणसाला मुकावे लागले, अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
दुसऱ्या गेटने रुग्णालयातसंतप्त कर्मचारी मनीषाला दुखापत करू शकतात याची कल्पना पोलिसांना होती. त्यामुळे तिला आणण्यासाठी रुग्णालयात मुख्य गेटचा वापर न करता दुसऱ्या गेटचा वापर केला. यामुळे कर्मचाऱ्यांना आरोपीच्या समोर येता आले नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले नाही. काही कर्मचाऱ्यांना तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच ठेवण्यात आले होते.
म्हणे घटस्फोटासाठी अर्जडॉक्टरांचे पुत्र आणि सुनेमध्ये मतभेद होते. आता ते दूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सुनेने घटस्फोटासाठी अर्ज केला होता, अशी माहिती समोर येत असून याबद्दल शहरातही तशी चर्चा सुरू आहे.
आज न्यायालयात हजर करणारमनीषा मुसळे-माने हिला मिळालेल्या वाढीव पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. यामध्ये तिला पोलिस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केली जाणार, याचा फैसला होणार आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत.