"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:11 IST2025-07-16T12:10:09+5:302025-07-16T12:11:03+5:30
श्रीजा डिप्रेशनमध्ये होती. ती रात्री उशिरा झोपायची आणि सकाळी १० च्या सुमारास उठायची.

फोटो - indian express
बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४८ वर्षीय महिलेने तिच्या मुलीच्या आत्महत्येनंतर काही मिनिटांतच स्वत:ही आत्महत्या केली. रचिता रेड्डी असं महिलेचं नाव असून २४ वर्षीय मुलीचं नाव श्रीजा रेड्डी होतं. रचिता या व्हाईटफील्ड पोलीस परिसरातील नागागोंडानहल्ली येथील रहिवासी होत्या. हे कुटुंब आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत आणि श्रीजा एका खासगी कंपनीत काम करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.४० च्या सुमारास रचिता त्यांच्या मुलीला उठवण्यासाठी आणि नाश्ता देण्यासाठी गेल्या. मात्र खोलीचा दरवाजा उघडताच त्यांना श्रीजाने आत्महत्या केल्याचं दिसलं. रचिता यांनी ताबडतोब पती श्रीधर रेड्डी यांना लेकीच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्या आता मुलीशिवाय जगू शकणार नाही असं सांगितलं.
कामावर गेलेल्या श्रीधर य़ांनी हे सर्व ऐकल्यावर आपल्या शेजाऱ्यांना घरी जाण्यास सांगितलं, परंतु ते येईपर्यंत रचिता यांनी देखील आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी श्रीजाने तेलुगूमध्ये एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने तिच्या मैत्रिणीचा उल्लेख केला होता आणि तिच्या मृत्यूसाठी दुसरं कोणीही जबाबदार नसल्याचा दावा केला होता.
श्रीजा डिप्रेशनमध्ये होती. ती रात्री उशिरा झोपायची आणि सकाळी १० च्या सुमारास उठायची. पण सोमवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत ती उठली नाही तेव्हा रचिता तिला उठवण्यासाठी गेल्या, लेकीने आत्महत्या केल्याचं पाहताच त्यांनी देखील मृत्यूला कवटाळलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.