आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:13 IST2026-01-12T17:11:53+5:302026-01-12T17:13:17+5:30
तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी होत असतानाच, सायबर भामट्यांनी आता थेट मानवी आवाजाची चोरी करायला सुरुवात केली आहे.

आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी होत असतानाच, सायबर भामट्यांनी आता थेट मानवी आवाजाची चोरी करायला सुरुवात केली आहे. इंदूरमध्ये एआय वॉयस क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एका शालेय शिक्षिकेची ९७,५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील एआय तंत्रज्ञानाद्वारे झालेली ही पहिलीच ठगी असल्याचे मानले जात असून, या घटनेने पोलीस दलाचीही झोप उडवली आहे.
नेमकं काय घडलं?
लसूडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शिक्षिकेला ६ जानेवारी २०२६ च्या रात्री एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन उचलताच पलीकडून जो आवाज आला, तो हुबेहूब त्यांच्या चुलत भावाचा होता. हा भाऊ उत्तर प्रदेश पोलिसांच्या डायल सेवेमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे, शिक्षिकेचे त्यांच्या भावाशी गेल्या दोन वर्षांपासून बोलणे झाले नव्हते. याच गोष्टीचा फायदा सायबर चोरांनी घेतला.
भावाच्या आवाजात 'इमर्जन्सी'चा बनाव
पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने शिक्षिकेला सांगितले की, "ताई, माझ्या एका मित्राला हृदयविकाराचा झटका आला असून, त्याला इंदूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असून मला पैशांची खूप गरज आहे." तो आवाज इतका हुबेहूब होता की शिक्षिकेला काडीचाही संशय आला नाही. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने घाई करत शिक्षिकेला व्हॉट्सॲपवर एक क्यूआर कोड पाठवला.
एका मिनिटात ९७ हजार गायब
भावावर संकट ओढवले आहे असे वाटून शिक्षिकेने कसलाही विचार न करता तात्काळ ९७ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा त्यांनी भावाच्या मूळ नंबरवर फोन केला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. भावाने अशा प्रकारचा कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्ट झाले आणि शिक्षिकेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, ठगांनी 'एआय वॉयस क्लोनिंग'च्या मदतीने भावाच्या आवाजाची नक्कल केली होती. मध्य प्रदेशातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने सायबर सेल आता अधिक सतर्क झाला आहे. सोशल मीडियावरील जुन्या व्हिडीओमधून किंवा कॉल रेकॉर्डिंगवरून आवाज चोरून अशी 'क्लोनिंग' केली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.