क्रूरता! हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी पतीने बोलावला मित्र; अनैतिक संबंधांतून पत्नीचा गळा आवळून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:45 IST2025-10-24T09:38:20+5:302025-10-24T09:45:05+5:30
गुजरातमध्ये पतीने अनैतिक संबंधातून पत्नीची निर्घृणपणे हत्या केली.

क्रूरता! हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी पतीने बोलावला मित्र; अनैतिक संबंधांतून पत्नीचा गळा आवळून खून
Gujarat Crime:गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील भेसान तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे झालेल्या वादामुळे पतीनेच आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या एका मित्रालाही पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानिया सस्ते हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असून, तो पत्नी नियतिसोबत सरदारपूर गावात शेतमजुरीचे काम करत होता. नानियाचे दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध होते. या अनैतिक संबंधांवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद आणि भांडणे होत असत. १८ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजता नानिया आणि नियति यांच्यात शेतात पुन्हा जोरदार भांडण झाले. वादाच्या भरात संतापलेल्या नानियाने पत्नी नियतिचा गळा आवळून तिचा खून केला.
मित्राच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी नानियाने त्याचा मित्र जेनू सोलंकी याची मदत घेतली. दोघांनी मिळून खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. तपासामध्ये आरोपी जेनू सोलंकी याच्याविरुद्ध मध्य प्रदेशात आधीच अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झालं.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू केला. हत्या कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी कसून चौकशी करून दोन्ही आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागील अन्य बाजू आणि पुरावे तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंधातून होत असलेले हत्याकांड गंभीर चिंता व्यक्त करत आहे.