झारखंडच्या चतरा जिल्ह्यात विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याठिकाणी सेरनगदाग येथील रहिवासी मनिष कुमार त्याच्या मेव्हुणीला घेऊन लग्न करण्यासाठी नोंदणी कार्यालयात पोहचला होता. मनिषचं पहिलं लग्न २०२१ साली संगीता देवीसोबत झाले होते. त्याला ९ महिन्याचा मुलगा आहे. मात्र मनिषने मुलाला दूधात विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप त्याची पत्नी संगीताने केला होता. त्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू होता.
पती-पत्नीच्या वादात मनिषचे त्याच्या मेव्हुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. या दोघांमधील जवळीक इतकी वाढली की दोघेही लग्न करण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात पोहचले. मात्र याची भनक मनिषच्या बायकोला लागली. त्यानंतर मनिषची बायको संगीता आणि त्याची सासू विवाह नोंदणी कार्यालयात दाखल झाले. सासूने मुलीला पकडले तर संगीताने पतीला बाहेर खेचत आणले. हा वाद वाढतच गेला, त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
जवळपास २ तास विवाह नोंदणी कार्यालयात हंगामा सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी मनिषला ताब्यात घेत चतरा येथील पोलीस स्टेशनला आणले. तिथे मनिषनेही त्याच्या पत्नीवर मानसिक छळाचा आरोप केला. त्याचवेळी संगीताने मनिषवर मुलाला मारण्याचा आरोप केला. १४ जानेवारीला माझ्या ९ महिन्याच्या मुलाची हत्या करण्याचा मनिषने प्रयत्न केला. त्याशिवाय २ वेळा त्याने जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे. ३० जुलैला तो माझ्या छोट्या बहिणीला घेऊन फरार झाला होता. त्यानंतर शुक्रवारी तो बहिणीला घेऊन कोर्टात पोहचल्याचं कळले, तेव्हा आम्ही तिथे गेलो असं पत्नी संगीताने सांगितले.
दरम्यान, विवाह नोंदणी कार्यालयात जोरदार राडा सुरू असल्याचं कळताच पोलिस पथकही घटनास्थळी पोहोचले आणि पती-पत्नीला पोलिस ठाण्यात आणले. सध्या मनिष पोलिसांच्या ताब्यात आहे. संगीता देवीही पोलिस ठाण्यात हजर होती. तिच्या पतीवर कठोर कारवाई व्हावी आणि त्याला तुरुंगात पाठवावे अशी संगीताने पोलिसांकडे मागणी केली आहे.