डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:25 IST2025-08-08T07:24:15+5:302025-08-08T07:25:00+5:30
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक
नागपूर : नागपुरातील एका व्यक्तीला मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात कारवाईची भिती दाखवत डिजिटल अरेस्ट करून २३ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रंजनकुमार विष्णुचरण पटनायक (६०, जगतसिंगपूर, ओडिसा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवून आणि मनी लाँड्रिंगसाठी कारवाई करण्याची धमकी देऊन एका व्यक्तीची २३.७१ लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी . ही घटना २ ते ३ जुलै दरम्यान घडली. तक्रारदाराला दूरसंचार विभाग आणि मुंबई पोलिसांच्या कुलाबा पोलिस स्टेशनचे असल्याची बतावणी करण्यात आली होती. त्याला घाबरविण्यासाठी मुंबई पोलिस, भारतीय सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, आरबीआय आणि ईडीचे बनावट सील असलेले बनावट कागदपत्रे पाठवण्यात आली.
तक्रारदाराला बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात २३ लाख ७१ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. १५ जुलै रोजी सायबर पोलिसांनी आयटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांना रंजनकुमारचे बँक खाते आणि मोबाईल नंबर सापडला. त्याचा पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. त्याचा मोबाईल नंबर देखील बंद होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांनी पटनायकला भुवनेश्वर येथून अटक केली. त्याला ११ ऑगस्टपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. पटनायकच्या खात्यात जमा झालेले १९.९० लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार,शंकर पांढरे, विनोद तोंडफोडे, रिंकेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.