खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 14:53 IST2022-04-24T14:49:26+5:302022-04-24T14:53:03+5:30
Explosive Found : माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि लष्करी छावणी चंडी मंदिर येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले.

खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी
चंदीगड - शनिवारी संध्याकाळी चंदीगडच्या हाय सिक्युरिटी बुडैल कारागृहाच्या भिंतीजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आली. बॅगेत स्फोटके असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि लष्करी छावणी चंडी मंदिर येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. दोन्ही पथके आपापल्या पद्धतीने तपास करत आहेत.
दुसरीकडे, एसएसपी कुलदीप चहल यांनी आज तकला सांगितले की, प्राथमिक तपासात बॅगमधून डिटोनेटर आणि काही जळलेल्या वायर्स सापडल्या आहेत. मात्र, अद्याप तपास सुरू आहे. बॅग सापडलेल्या संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून संशयित स्फोटकांची छायाचित्रे समोर आली आहेत.
या कारागृहात अनेक हायप्रोफाईल गुन्हेगार आणि दहशतवादी कैद असल्याची माहिती आहे. येथील भिंत तोडून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचा कट रचला गेला आहे का याची तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.