मुंबई - सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय, तपास कामातील दिरंगाईबद्दल दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणे आता विभागीय स्तरावरही लवकरच कार्यान्वित होणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसाम्रुगी खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.नवी मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती याठिकाणी ही विभागीय प्राधिकरण सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांना आपल्यावरील तक्रारीला त्याठिकाणी दाद मागता येणार आहे. त्यासाठी मुंबईत येण्यासाठी घालाव्या लागणाऱ्या येरझाऱ्या बंद होणार आहेत.राज्यातील नागरिकांवर पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाला दाद मागण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५५ च्या २२ कलमानुसार पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना १० सप्टेंबर २०१४ रोजी केली. मुंबईतील मुख्यालय निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून विभागीय स्तरावरील प्राधिकरणे अनुक्रमे १३ एप्रिल २०१७ व १५ एप्रिल २०१८ रोजी घटीत केली आहेत. यापैकी पुणे व नाशिक येथील प्राधिकरणाची प्राथमिक कामे सुरु असून उर्वरित चार ठिकाणी लवकर कार्यान्वित होतील, त्यासाठी या कार्यालयातील पोस्टेज, झेरॉक्स व अन्य किरकोळ स्वरुपाचे खर्च भागविण्यासाठी अग्रिम खर्चाला मंजुरी दिली आहे. संबंधित विभागीय प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला त्यासंबंधी अधिकार दिले आहेत, त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे, असे गृह विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत.
पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच होणार कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 21:35 IST
सहा ठिकाणी सुरु होणार कार्यालये
पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच होणार कार्यान्वित
ठळक मुद्देनवी मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती याठिकाणी ही विभागीय प्राधिकरण सुरु केली जाणार आहेत. मुंबईत येण्यासाठी घालाव्या लागणाऱ्या येरझाऱ्या बंद होणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसाम्रुगी खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.