Demanding ransom of Rs 5 crore from MLA Prakash Bharasakle for threatening to kill the child | भाजपा आमदाराकडे मागितली ५ कोटींची खंडणी; मुलाला जीवे मारण्याचीही धमकी

भाजपा आमदाराकडे मागितली ५ कोटींची खंडणी; मुलाला जीवे मारण्याचीही धमकी

ठळक मुद्देया ‘लेटर बॉम्ब’मुळे दर्यापूर व अकोट मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे.

दर्यापूर (अमरावती) : अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाच कोटींच्या खंडणीची मागणी पाकीटबंद पत्राद्वारे करण्यात आली आहे. ही रक्कम न दिल्यास त्यांच्यासह मुलगा व कुटुंबीयांना संपविण्याची धमकी या कथित खंडणीखोरांनी दिली आहे. आमदारांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी हे पत्र आल्याची तक्रार दर्यापूर पोलिसांत करण्यात आली. या ‘लेटर बॉम्ब’मुळे दर्यापूर व अकोट मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे.


भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे हे दर्यापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष, मुलगा विजय भारसाकळे हे जिनिंग-प्रेसिंगचे संचालक आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे पत्र शिवाजीनगर स्थित निवासस्थानी २० फेब्रुवारी रोजी टपालाने प्राप्त झाले. त्याबाबत आमदारांना कळविण्यात आल्यानंतर स्वीय सहायक सुधाकर हातेकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलिसांत तक्रार नोंदविली. भारसाकळे कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारपासून सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदार प्रकाश भारसाकळे २८ फेब्रुवारी रोजी मुंबईला रवाना झाले. ते एकंदर घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत.२८ फेब्रुवारीचा अल्टिमेटम
खंडणी न दिल्यास आमदारांसह त्यांच्या कुटुंबाला गोळ्या घालून वा अपघात घडवून संपविण्याची भाषा करणारे हे पत्र हिंदी भाषेत आहे. पोलिसांना किंवा अन्य कुणाला याबाबत माहिती दिल्यास नुकसान भोगावे लागेल, असा उल्लेख आहे. सदर पत्रात २८ फेब्रुवारीपर्यंत पाच कोटींची खंडणी म्हणून व्यवस्था करून ठेवण्याची धमकी दिली आहे.

४० लोकांची टोळी
आमदार भारसाकळे यांना खंडणीची मागणी करणाऱ्या पत्रात, हे पत्र पाठविणारे एकूण ४० लोक असल्याचे नमूद आहे. रक्कम दर्यापूर येथे २८ फेब्रुवारीला मिळायला हवी. त्यानंतर आम्ही बिहारला निघून जाऊ. आमच्यापैकी एकही पकडला गेल्यास नुकसान भोगावे लागेल, असेही त्यात नमूद आहे. चौकशीसाठी हे पत्र दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

सदर प्रकरण तपासात घेतले आहे. तपासाअंती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमदारांच्या कुटुंबीयांना एका पोलिसाची सुरक्षा देण्यात येईल. भारसाकळे अधिवेशनाहून आल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात येईल. - प्रमेश आत्राम, ठाणेदार, दर्यापूर
 

३० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच धमकीचे पत्र प्राप्त झाले. पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. दर्यापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवावा व दोषींवर कारवाई करावी. - प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट
 

Web Title: Demanding ransom of Rs 5 crore from MLA Prakash Bharasakle for threatening to kill the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.