मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबंधाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 15:01 IST2021-01-16T15:00:43+5:302021-01-16T15:01:13+5:30
मार्केटयार्ड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबंधाची मागणी
पुणे : शहरातील अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसून आले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी केवळ मसाजच केला जातो. तरीही तेथे काम करणार्या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्याकडूनही तशाच अपेक्षा ठेवल्या जातात. असाच काहीसा प्रकार मार्केटयार्ड येथे घडला. महिलेचा मसाज करतानाची व्हिडिओ क्लिप तयार करुन ती व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसंबंधाची मागणी करणार्यास मार्केटयार्ड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
मार्केटयार्ड पोलिसांनी सुरेश किसन माने (वय ३२, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्डातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात १३ ते १५ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी मसाज करणार्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.
ही महिला एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्याचे काम करते. सुरेश माने हा ग्राहक म्हणून या केंद्रात आला होता. त्याने तेथे मसाज करुन घेतला. मसाज करताना त्याने फिर्यादीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ व्हायरल करतो नाही तर माझ्यासोबत शरीर संबंध कर अशी धमकी या तरुणाने महिलेला दिली. त्याने मसाज करतानाचा व्हिडिओ तिच्या मोबाईलवर पाठवून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी धमकावणार्या सुरेश माने याला अटक केली असून पोलीस निरीक्षक ढमढेरे अधिक तपास करीत आहेत.