लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला मारण्यासाठी पाकिस्तानात कट; टारगेट किलिंग मॉड्यूलचा पर्दाफाश, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:10 IST2025-12-01T19:10:07+5:302025-12-01T19:10:37+5:30
Anmol Bishnoi: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय च्या इशाऱ्यावर कार्यरत असलेल्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. ...

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला मारण्यासाठी पाकिस्तानात कट; टारगेट किलिंग मॉड्यूलचा पर्दाफाश, तिघांना अटक
Anmol Bishnoi: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय च्या इशाऱ्यावर कार्यरत असलेल्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या मॉड्यूलचे सूत्रचालन पाकिस्तानमधून कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी करत होता. भट्टीला आयएसआयचा पूर्ण पाठिंबा होता आणि त्याच्या आदेशानुसार हे मॉड्यूल भारतात अनेक टारगेटेड किलिंग्ज घडवून आणण्याच्या तयारीत होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलच्या टार्गेटवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई देखील होता. अनमोलला नुकताच अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे.
तिघे गजाआड; थेट भट्टीच्या संपर्कात
याप्रकरणी पोलिसांनी हरगुनप्रीत सिंह, विकास प्रजापती आणि आरिफ या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे तिघेही थेट शहजाद भट्टीच्या संपर्कात होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद कुमार यांनी दिली. अटक केलेले आरोपी अनुक्रमे पंजाब, मध्य प्रदेशातील दतिया आणि उत्तर प्रदेशातील बिजनौरचे रहिवासी आहेत.
पंजाब पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २७ नोव्हेंबर रोजी पंजाबमधील गुरुदासपूर शहर पोलीस स्टेशनबाहेर ग्रेनेड फेकणारे हेच आरोपी आहेत. मोबाईल चॅट्स आणि व्हॉइस नोट्स तपासल्यानंतर हा हल्ला भट्टीच्या निर्देशानुसारच करण्यात आला होता, हे स्पष्ट झाले आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या तिघांनी पंजाबमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. व्हॉइस नोट्स आणि सोशल मीडियावरील संभाषणांच्या आधारे, पोलीस हा गट केवळ एक गँग नसून, तो एका पूर्ण दहशतवादी मॉड्यूल प्रमाणे काम करत होता, असे सांगत आहेत. भट्टी सोशल मीडियावर तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्याच्या जुन्या टॅक्टिक्सचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे.
अनमोल बिश्नोईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या मोठ्या खुलास्यानंतर अनमोल बिश्नोईच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर रोजी अनमोलने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात अर्ज करून पाकिस्तानमधील शहजाद भट्टीकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे स्पष्ट केले होते. २८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देखील न्यायालयात या माहितीची पुष्टी केली होती. या धोक्यानंतर अनमोल बिश्नोईने कोर्टाकडे मागणी केली आहे की, त्याला न्यायालयात हजर करताना बुलेटप्रूफ गाडी आणि बाहेर बुलेटप्रूफ जॅकेट पुरवण्यात यावे. तसेच, त्याने आपल्या वकिलांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन त्यांनाही योग्य ती सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणात लवकरच आणखी काही अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे. अटकेत असलेल्या विकास प्रजापतीकडून एक पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.