Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:14 IST2025-10-02T12:13:08+5:302025-10-02T12:14:50+5:30
कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली.

Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
Munawar Faruqui News: दिल्लीतील जैतपूर-कालिंदी कुंज रस्त्यावर गुरुवारी पहाटे पोलीस आणि गोल्डी बरार टोळीच्या गुंडामध्ये चकमक झाली. धुमश्चक्रीनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने रोहित गोदरा-गोल्डी बराड आणि विरेंद्र चारण या टोळीतील दोन शूटर्संना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही शूटर्संनी कॉमेडियन मुनव्वर फारूकीच्या हत्येचा कट रचला होता, तो त्यांच्या निशाण्यावर होता.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे राहुल (पानीपत, हरयाणा) आणि साहील (भिवानी, हरयाणा) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चकमकीमध्ये दोन्ही आरोपी जखमी झाले आहेत. जखमी आरोपी राहुल हा डिसेंबर २०२४ मध्ये यमुनानगरमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडात सहभागी होता. तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता.
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी काही दिवसांपासून परदेशात असलेल्या रोहित गोदरा आणि गोल्डी बरार, तसेच विरेंद्र चारण यांच्या सांगण्यांनुसार काम करत होते. एका सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सरची म्हणजे मुनव्वर फारूकीची हत्या करण्याच्या प्रयत्नात ते दोघेही होते. त्यांनी मुनव्वर फारुकीची मुंबई आणि बंगळुरूमध्ये रेकीही केली होती.
दोन्ही जखमी आरोपींना पोलिसांनी रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून शस्त्र आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, मुनव्वर फारुकी त्यांच्या निशाण्यावर होता. पण, वेळीच कारवाई केल्याने त्याचा डाव उधळला गेला.