११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:12 IST2025-11-19T12:06:07+5:302025-11-19T12:12:13+5:30
दिल्ली स्फोटापूर्वी स्वत:ला उडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हल्ल्याच्या २ आठवडे पूर्वी पुलवामाच्या कोइल गावात त्याच्या घरी गेला होता

११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
नवी दिल्ली - लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारसह स्वत:ला उडवणाऱ्या डॉ. उमर नबीने त्याच्यासारखे आणखी काही सुसाइड बॉम्बर तयार करण्यासाठी कट रचला होता. त्यासाठी तो सातत्याने व्हिडिओ बनवून युवकांना पाठवायचा, जेणेकरून त्यांचे ब्रेनवॉश होईल. तपास यंत्रणांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.
NIA सूत्रांनुसार, अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनमधून डॉ. उमरचे १२ व्हिडिओसह ७० हून अधिक व्हिडिओ सापडले आहेत. असेच व्हिडिओ ११ लोकांना पाठवण्यात आले. त्यातील ७ जण मूळ काश्मिरी होते. सर्व अल फलाह यूनिवर्सिटीशी लिंक होते. इतर ४ युवक उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात राहणारे होते. तपासात हेदेखील समोर आलं की, आमिर राशीद अली, ज्याने उमर नबीला आय २० कार दिली होती, तोही सुसाइड बॉम्बर बनण्याच्या तयारीत होता. उमरने त्यालाही ब्रेनवॉश करणारे व्हिडिओ पाठवले होते. उमर नबी एक विद्रोही टीम तयार करत होता, ज्याचे टार्गेट सर्व राज्यातील युवा होते असं समोर आले आहे.
दिल्लीस्फोटापूर्वी स्वत:ला उडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हल्ल्याच्या २ आठवडे पूर्वी पुलवामाच्या कोइल गावात त्याच्या घरी गेला होता. उमरने त्याच्या २ मोबाईलपैकी एक भाऊ जहूर इलाहीला दिला होता, जर माझ्याबाबत काही बातमी आली तर फोन पाण्यात फेकून दे असं त्याने सांगितले होते. त्यात फोनमधून हे व्हिडिओ सापडले आहेत. ज्यात उमरने आत्मघाती हल्ल्याला शहादत का ऑपरेशन असं म्हटले होते. जहूरने सुरक्षा यंत्रणांना चौकशीत फोनविषयी माहिती दिली. उमरने २६ ते २९ ऑक्टोबरच्या दरम्यान हा फोन दिला होता. ९ नोव्हेंबरला अल फलाह यूनिवर्सिटीतून उमरच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर जहूरने घाबरून उमरने दिलेला फोन घराजवळील एका तलावात फेकला होता.
दरम्यान, तपास यंत्रणांनी ९ नोव्हेंबरला उमरचे दोन्ही फोन तपासायला सुरुवात केली, तेव्हा ते बंद होते. एका फोनचे शेवटचे लोकेशन दिल्ली आणि दुसऱ्या फोनचे पुलवामा होते. त्याचवेळी जहूरची चौकशी सुरू होती, तेव्हा दिल्लीत आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. तलावातून फोन काढला, परंतु तो खराब झाला होता. त्यानंतर तपास यंत्रणांनी त्यातील डेटा रिकव्हर केला. फोन आणि डिजिटल पुरावेही NIA ला सोपवले आहेत. या व्हिडिओत उमर थोडंफार इंग्रजीत बोलताना आढळतो. डॉ. उमरने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला आय २० कारमध्ये आत्मघाती हल्ला केला. ज्यात १५ लोकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. या प्रकरणी ८ अटकेत आहेत त्यातील ५ डॉक्टर आहे.