दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:14 IST2025-11-18T20:13:26+5:302025-11-18T20:14:05+5:30
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अहमद मोहियुद्दीन सैयद याला तुरुंगातील इतर तीन कैद्यांनी बेदम मारहाण केली आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ
अहमदाबादमधील साबरमती सेंट्रल जेलच्या आतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अहमद मोहियुद्दीन सैयद याला तुरुंगातील इतर तीन कैद्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून, घटनेनंतर जेल प्रशासन आणि तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमद मोहियुद्दीन सैयद याच्यावर तुरुंग परिसरात अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याला डोळा, चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने साबरमती तुरुंगात धाव घेतली. हा हल्ला कैद्यांमधील वैयक्तिक वादातून झाला की, तुरुंगातील सुरक्षा भेदून घडवलेले हे कोणते संघटित षडयंत्र होते, याचा तपास सुरू आहे.
साबरमती तुरुंगात यापूर्वीही तस्करी आणि अनधिकृत मोबाईल फोनच्या घटनांमुळे सुरक्षा भंग झाल्याचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर थेट हल्ला झाल्याने तुरुंगाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सैयद याने अद्याप हल्ल्यामागचे स्पष्ट कारण सांगितले नसले तरी, हल्ला करणाऱ्या तीन कैद्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या चौकशीचे काम पोलीस आणि एटीएस करत आहेत.