पोलिसांनी तपास बंद केल्याने आईने शोधून काढला मुलाच्या हत्येतील आरोपी; दोन वर्षांनी पुन्हा चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:22 IST2026-04-08T10:14:27+5:302026-04-08T10:22:00+5:30
देहरादूनमध्ये पोलिसांनी योग्य तपास न केल्याने आईनेच मुलाच्या अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला शोधून काढले.

पोलिसांनी तपास बंद केल्याने आईने शोधून काढला मुलाच्या हत्येतील आरोपी; दोन वर्षांनी पुन्हा चौकशी सुरू
Dehradun Hit and Run Case: दोन वर्षापूर्वी देहरादूनमध्ये डंपरची धडक बसल्याने १८ वर्षीय क्षितिज चौधरीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र दोन वर्षे उलटली असली, तरीही पोलीस अद्याप आरोपी चालकापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलिसांनी हात वर केल्यानंतर देहरादूनमधील ललिता चौधरी यांनी क्षितिजच्या मृत्यूचा तपास स्वतःच्या हाती घेतला. क्षितिजच्या आईने पुरावे गोळा करुन गुन्हेगार समोर आणला असतानाही, पोलिसांनी तपास बंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
१६ फेब्रुवारी २०२४ ची ती रात्र क्षितिजच्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा क्षितिज दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या भरती परीक्षेला जाणार होता. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने त्याच्या मृत्यूचा तपास रखडला असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. रस्ता ओलांडताना एका डंपरने त्याला चिरडले. १९ फेब्रुवारीला गुन्हा तर दाखल झाला, पण पोलिसांनी अतिशय संथगतीने तपास सुरु केला. ललिता यांनी जेव्हा तपास अधिकाऱ्याला जाब विचारला, तेव्हा त्यांना मिळालेले उत्तर अत्यंत उद्धट होते. आरोपीला इतक्या लवकर शोधण्यासाठी माझ्याकडे काही जादूची कांडी नाही, असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.
"ज्या पोलिसांच्या मदतीची अपेक्षा होती, त्यांनीच अपमान केला. तेव्हाच ठरवलं की, आता माझ्या मुलाला न्याय मीच मिळवून देणार," असं म्हणत ललिता यांनी मुलाच्या आरोपीचा शोध सुरु केला.
रात्र जागून गोळा केले सीसीटीव्ही फुटेज
एका सामान्य गृहिणीसाठी पोलीस तपास करणे सोपे नव्हते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ललिता चौधरी यांनी रात्र रात्र जागून अपघाताच्या ठिकाणचे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. शेकडो तासांचे फुटेज पाहून त्यांनी संशयास्पद १० गाड्यांची यादी तयार केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी एका डंपरला शोधून काढले आणि त्याच्या नंबरसह सर्व पुरावे पोलिसांना दिले.
पुरावे असूनही केस बंद!
ललिता यांनी दिलेल्या पुराव्यांवर कारवाई करण्याऐवजी देहरादून पोलिसांनी सप्टेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबाला याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. कोणताही पुरावा किंवा लीड न मिळाल्यामुळे केस बंद करण्यात येत आहे" असे कारण पोलिसांनी दिले. क्षितिजच्या मृत्यूनंतर या बातमीने ललिता यांना दुसऱ्यांदा धक्का बसला. जर पोलिसांनी दिलेल्या पुराव्यांचा पाठपुरावा केला असता, तर आरोपी आज तुरुंगात असता, असं ललिता म्हणाल्या.
गेली दोन वर्षे ललिता या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. नुकत्याच देहरादूनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत ललिता यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोभाल यांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.