जन्मठेप की फाशी, तिहेरी हत्याकांडाचा आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:39 IST2020-01-23T01:39:11+5:302020-01-23T01:39:36+5:30
पिठाच्या गोण्या चोरण्यासाठी केली होती हत्या, ठाणे न्यायालयाने ठरवले तिन्ही आरोपींना दोषी

जन्मठेप की फाशी, तिहेरी हत्याकांडाचा आज निकाल
ठाणे : पिठाच्या गोण्या चोरण्याच्या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी ट्रकचालक आणि क्लीनरसह तिघांची हत्या करून एक क्लीनरला गंभीर जखमी करणारा ट्रकचालक अनिस नबी खाँ, सकुर अब्दुल रहेमान खाँ आणि अजितकुमार मिश्रा या तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी बुधवारी दोषी ठरवले.
नोव्हेंबर २०१२ मध्ये ट्रकचालक राजेश यादव याचा मृतदेह भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. त्याचदरम्यान कोनगाव परिसरात छोटू ऊर्फ श्रीकांत यादव हा जखमी अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून अनिस, सकुर आणि अजितकुमार मिश्रा या तिघांना अटक केली. या प्रकरणातील चौथा आरोपी जब्बार खान हा अद्यापही फरार आहे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी केवळ राजेशचीच नव्हे तर, ट्रकचालक हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात फेकल्याचे समोर आले.
अनिस आणि ट्रकचालक हरिसिंग हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. ते वेगवेगळ्या ट्रकमध्ये पिठाच्या गोण्या भरून २६ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, अनिसने हरिसिंग याच्या ट्रकमधील गोण्या चोरण्याच्या उद्देशाने तिघा मित्रांच्या मदतीने हरिसिंग व नितीन यांना जेवणात गुंगीचे औषध देऊन त्यांची गळा आवळून हत्या केली. २७ नोव्हेंबरला मालेगाव येथे राजेश यादव हा ट्रक घेऊन त्याच्यामागे येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजेशला चहा पिण्यासाठी थांबवले. चहा पिऊन झाल्यावर अनिसने राजेश आणि छोटूला जेवण्याचा आग्रह करत नाशिकला एका ढाब्यावर थांबवले. त्यावेळी राजेशला ट्रकमध्ये हरिसिंग आणि नितीनचे मृतदेह दिसले. त्यावरून संशय आल्याने राजेशने अनिसला विचारणा केली. आपले बिंग फुटेल, या भीतीने अनिसने राजेश आणि छोटूलाही जेवण आणि चहातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर, संधी साधून त्यांनी राजेशला ठार मारत, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गादीत गुंडाळून टाकून दिला. छोटू हादेखील ठार झाल्याचे समजून आरोपींनी त्यालाही फेकले. त्यानंतर चौघांनी ३१ हजार ५०० किलोच्या पिठाच्या ६३१ गोण्या चोरून नेल्या.
आरोपींचे वकील हजर नसल्याने न्यायालयाने निकाल ठेवला राखून
जन्मठेप की फाशीची शिक्षा द्यावी, याबाबत न्यायालयाने आरोपींना विचारणा केली. मात्र, आपण गुन्हा केलाच नसल्याच्या युक्तिवादावर आरोपी ठाम राहिले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली. या सुनावणीवेळी तीन आरोपींपैकी दोघांचे वकील अनुपस्थित होते.
आरोपींचे वकील हजर नसल्याने शिक्षेचा निकाल न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल गुरुवारसाठी राखून ठेवला आहे. हे हत्याकांड आठ वर्षांपूर्वी घडले होते. या खटल्यात सरकारी पक्षाने २६ साक्षीदार तपासले. त्यांनी सादर केलेले पुरावे, युक्तिवाद ग्राह्यमानून न्यायालयाने तिघांना दोषी ठरवले.