रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:23 IST2018-09-10T15:22:23+5:302018-09-10T15:23:20+5:30
दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्री रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू झाला. जयेश (२५) व आकाश मिलिंद बागूल (२०; रा राजनगर मुकुंदवाडी ) अशी मृत भावांची नावे आहेत. दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, जयेश आणि आकाश हे मुकुंदवाडी येथील राजनगर येथे राहत. जयेश बिगारी काम करत असे तर आकाश रिक्षा चालवत असे. रविवारी सायंकाळी दोघांमध्ये काही घरगुती कारणांमुळे वाद झाले. रागाच्या भरात जयेश, मी आत्महत्या करत असल्याचे सांगत घरातून बाहेर पडला. हे ऐकताच आकाश त्याच्या मागे गेला. जयेश मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसराकडे धावतच निघाला. याच दरम्यान तेथून जनशताब्दी एक्स्प्रेस धावत होती. जयेश व रेल्वेत कमी अंतर राहिले होते. यामुळे पुढे धावणाऱ्या जयेशला आकाश ने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही रेल्वेची जोरदार धडक बसली. यातच त्यांचा मृत्यू झाला.