दाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 00:06 IST2021-09-16T22:10:31+5:302021-09-17T00:06:29+5:30
Dawood's Aid on Mumbai Police's Radar : मुंबईला पुन्हा रक्तबंबाळ करण्याचे दुष्कृत्य दाऊद करू शकतो आणि म्हणूनच त्या हस्तकांवर पाळत ठेवून ते कुठे राहतात? काय करत आहेत? जर एखाद्याने त्याचा पत्ता बदलला आहे तर तो सध्या कुठे राहतो या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

दाऊदचे हस्तक मुंबई पोलिसांच्या रडारवर; त्यांची पाळंमुळं खणण्यास सुरुवात
दिल्लीपोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीचा सुद्धा समावेश होता. जान मोहम्मद शेख हा धारावीमध्ये राहणारा आहे. जान मोहम्मद हा दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता आणि अनिसने स्फोटकं घेण्यासाठी हवालाच्या माध्यमाने जान मोहम्मदला पैसे देखील पाठवले होते. त्यामुळे मुंबईमध्ये दाऊदचे हस्तक अजूनही सक्रिय असल्याने पुन्हा एकदा मुंबईतील तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. आता दाऊदच्या जुन्या साथीदारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच जानच्या दिल्लीवारीदरम्यान १६ जण संपर्कात होते. ते कोण कोण होते, त्यांना देखील मुंबई पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये घडवण्यात आलेल्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद होता. मुंबईमधील दाऊदच्या हस्तकांनी त्याला ते बॉम्बस्फोट घडवून आणण्यात मदत केली होती. त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करून मुंबईला पुन्हा रक्तबंबाळ करण्याचे दुष्कृत्य दाऊद करू शकतो आणि म्हणूनच त्या हस्तकांवर पाळत ठेवून ते कुठे राहतात? काय करत आहेत? जर एखाद्याने त्याचा पत्ता बदलला आहे तर तो सध्या कुठे राहतो या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुदैवाने दाऊदचा हा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने उधळून लावला.
जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्यानंतर मुंबईतील तपास यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ४ आणि ५ चे पथक सर्वात आधी जान मोहम्मदच्या धारावी येथील घरी पोहोचले आणि त्याच्या घराची झाडाझडती सुरू करून त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यानंतर त्यांना चौकशीसाठी धारावी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.