क्रूरतेचा कळस! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा लेकीने घेतला जीव; वर्षभर घरात लपवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:06 IST2026-03-26T12:06:15+5:302026-03-26T12:06:51+5:30
एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह तब्बल एक वर्ष घरातच लपवून ठेवला.

फोटो - ndtv.in
हैदराबादमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह तब्बल एक वर्ष घरातच लपवून ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत नगर येथे ही भयंकर घटना घडली आहे. अंजू (४०) असं मृत महिलेचं नाव असून त्या मे २०२५ पासून बेपत्ता होत्या. त्यावेळी जवाहर नगर आणि बोलारम पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती, मात्र खूप वेळ झाला तरी त्यांचा कोणताही पत्ता लागला नव्हता.
पोलीस तपासादरम्यान हे प्रकरण एक गूढ बनलं होतं. सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की, अंजू यांची हत्या त्यांच्या मुलीनेच बॉयफ्रेंडसोबत मिळून केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या प्रेमसंबंधात आईला अडथळा मानत होती, त्यातूनच दोघांनी हत्येचा कट रचला.
असा आरोप आहे की, अंजू यांची घरातच हत्या करण्यात आली आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह त्याच घरात ठेवला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपी त्याच घरात सामान्य आयुष्य जगत होते. सुमारे एका वर्षानंतर पोलिसांना या सत्याचा उलगडा झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.