प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं म्हणून सासूलाच संपवलं; हत्या करून रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:36 IST2026-03-12T16:36:29+5:302026-03-12T16:36:29+5:30

Mathura Crime: मुलीसारख्या असलेल्या सुनेनेच सासूची निर्घृणपणे हत्या केली.

Daughter in law Arrested for Murdering Mother in law in Mathura | प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं म्हणून सासूलाच संपवलं; हत्या करून रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव..

प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं म्हणून सासूलाच संपवलं; हत्या करून रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव..

UP Crime: ज्या सुनेला पोटच्या मुलीप्रमाणे मानले, तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील मथुरेत उघडकीस आली आहे. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचून सासूवर अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. मात्र, एका संशयाने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आणि आता सून तिच्या प्रियकरासह गजाआड पोहोचली आहे.

मथुरा जिल्ह्यातील भाणकरपूर बसेला गावात ही घटना घडली. ३ मार्चच्या रात्री सासूला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत सुनेने आरडाओरडा केला. घरातील सर्वांना वाटले की वृद्ध महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणताही संशय न घेता कुटुंबीयांनी मृतदेहाचे दफन करून अंत्यसंस्कार पार पाडले.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी मृताच्या पतीला सुनेच्या वागण्यावर संशय येऊ लागला. पत्नीचा मृत्यू इतका अचानक कसा झाला आणि सुनेच्या हालचाली संशयास्पद का आहेत, या प्रश्नांनी त्यांना सतावले. अखेर त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, गाडलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली. महिलेचा मृत्यू हृदयविकाराने नाही, तर गळा आवळल्याने आणि मानेचे हाड मोडल्याने झाला होता.

मध्यरात्रीचे 'ते' दृश्य आणि हत्येचा कट

पोलिसी तपासात आणि चौकशीत सुनेने आपला गुन्हा कबूल केला. ३ मार्चच्या मध्यरात्री १ च्या सुमारास सुनेचा प्रियकर आदिल गुपचूप घरात शिरला होता. सासूने या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. आपले पितळ उघडे पडेल आणि समाजात नाचक्की होईल, या भीतीने सून आणि आदिलने सासूला संपवण्याचा कट रचला.

दोघांनी मिळून उशीच्या साहाय्याने सासूचा गळा दाबला, ज्यामध्ये त्यांच्या मानेचे हाड मोडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे ३ च्या सुमारास सुनेने पतीला फोन करून आईला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला होता.

आरोपी गजाआड

मथुरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत सून आणि तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही अटक केली आहे. "या घटनेचा सखोल तपास सुरू असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Daughter in law Arrested for Murdering Mother in law in Mathura