'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:56 IST2025-12-15T14:54:56+5:302025-12-15T14:56:20+5:30
पत्नीचे निधन झाले. पाच मुलांची जबाबदारी अंगावर पडली. वर्षभरापासून संसाराचा गाडा एकट्यानेच ओढत असलेल्या बापाच्या डोक्यात नको, तो विचार शिरला आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.

'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
'पप्पा, लंघुशंकेला बाहेर गेले होते. ते घरात आले आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना एकापाठोपाठ गळफास लावला. त्यानंतर त्यांनी स्वतःही गळफास घेतला', ६ वर्षाचा शिवम रडत रडत हे सगळं सांगत होता. वडिलांनी पाच मुलांना गळफास लावला, त्यात ६ वर्षांचा शिवम आणि ६ वर्षाचा चंदनही होता. पण, या घटनेतून ते वाचले.
रविवारी रात्री बिहारमधील मुजफ्फपूर जिल्ह्यात ही घटना घडली. मुलांच्या ओरडण्यामुळे गावकरी धावून आले. त्यांनी घरात बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. घरात चौघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते.
अमरनाथ राम (वय ४०), राधा कुमारी (वय ११), राधिका (वय ९), शिवानी (वय ७) अशी मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. अमरनाथ राम यांनी पाच मुलांना गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघे वाचले, तर तीन मुलींचा मृत्यू झाला.
दोन मुलांचा जीव कसा वाचला?
शिवमने सांगितले की, माझ्या आणि चंदनच्या गळ्यात फास टाकला आणि आम्हाला छताला लटकाले होते. पण, घरात ठेवलेल्या एका पेटीवर आमच्या दोघांचे पाय टेकले. त्यामुळे आम्हाला आधार मिळाला आणि आम्ही हाताने फास सोडला. आम्ही फास मोकळा करून खाली उतरल्यानंतर रडायला लागलो.
आम्ही बहिणींसोबत घरातच होतो
शिवमने सांगितले की तिन्ही बहिणी आणि दोन्ही भाऊ असे पाच जण घरात होते. शिवम म्हणाला मला झोप येत नव्हती. मी मोबाईल बघत बसलो होतो. तितक्या पप्पा लघुशंकेसाठी बाहेर गेले. परत घरात येताच त्यांनी एकाएकाला पकडून घरातील कपड्यांनी फास लावून छताला लटकावण्यास सुरूवात केली.
त्यांनी आधी तिन्ही बहिणींना फास लावून लटकवले. त्यानंतर आम्हा दोघांच्या गळ्यात फास टाकून छताला लटकावलं. आणि नंतर त्यांनी स्वतः गळफास घेतला. माझा आणि माझ्या भावाचा बाजूला ठेवलेल्या पेटीवर पाय पोहोचला आणि आम्ही फास सोडून खाली उतरले.
समोर आलेल्या माहितीनुसार अमरनाथ राम यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे पाऊल उचलले. पत्नीचा मृत्यू झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते तणावाखाली होते.