Cyber Fraud:मुंबईपोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका जोडप्यासह १२ जणांना अटक झाली आहे. आरोपींनी विविध बँक खाती आणि सिम कार्ड्सद्वारे देशभरातील लोकांची ६०.८२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस तपासात ९४३ बँक खाती आढळली, ज्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अनेक बँक पासबुक आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत सक्रिय होती.
तपासात असे दिसून आले की, या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करायचे.
मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षभरापासून सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांकडून लुबाडण्यात आली. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले की, टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते.