क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ
By पूनम अपराज | Updated: October 17, 2020 21:03 IST2020-10-17T20:59:41+5:302020-10-17T21:03:05+5:30
Crime News : याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.

क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ
क्षुल्लक कारणावरून झालेला वाद पेटला. तो वाद मारहाण आणि अगदी जीव घेण्यापर्यंत पोहोचला. क्रूरतेचा कळस म्हणजे या वादात महिलेची जीभच छाटण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना अयोध्येतील आशापूर सरैया गावात घडली आहे. सार्वजनिक जागेच्या साफसफाईवरून वाद झाला. या वादावरून एका महिलेला बेदम मारहाण करत तिची जीभ कापली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.
गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपल्या घरासमोर धान्य ठेवण्यासाठी जागेची साफसफाई करत होती. त्यावेळी गावातीलच अर्जुन नावाच्या व्यक्तीने तिला साफसफाई करण्यास मनाई केली. मात्र, सुनिताने न जुमानता काम सुरूच ठेवलं. त्यामुळे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने सुनिताला मारहाण केली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही तर तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.तिच्या गळ्यावर पाय ठेवल्यानंतर सुनिताची जीभ बाहेर आली. त्यावेळी तिची जीभ त्यांनी कापून टाकली.
जीभ छाटल्याने तडफडणारी सुनिता ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक धावत आले आणि त्यांनी सुनिताचा जीव वाचवला. गोसाईगंजमधील आरोग्य केंद्रात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडितेचा पती रामप्यारे वर्माने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पत्नीला मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.
Hathras gangrape : CBI ची टीम पीडित कुटुंबियांच्या घरी, आई अन् वाहिनीचा नोंदवणार जबाब https://t.co/xi3kj3krNK
— Lokmat (@MiLOKMAT) October 17, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने अर्जुन आणि चंद्रकात नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिलेली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे.