युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणी गुंड बापू नायरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 21:45 IST2020-11-02T21:45:20+5:302020-11-02T21:45:36+5:30
मारटकर खुन प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक

युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणी गुंड बापू नायरला अटक
पुणे : शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खुन प्रकरणात आज गुंड बापू ऊर्फ कुमार प्रभाकर नायर (रा. इंदिरानगर) याला आज येरवडा कारागृहात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
बापू नायर याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या साथीदारांनी ससून रुग्णालयात भेट घेतली होती. यावेळी दीपक मारटकर यांचा खुनाचा कट रचण्यात आला होता. फरासखाना पोलिसांनी मारटकर खुन प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. बापू नायर याच्या सूचनेनुसार हा खून करण्यात आल्याचे आरोपींच्या तपासात उघड झाले होते. त्यानुसार न्यायालयातून त्यांच्या अटकेचे वॉरंट पोलिसांनी प्राप्त केले. त्यानंतर त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस बंदोबस्त असताना नायर याला आरोपी भेटल्याने त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या ६ पोलिस कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.