रवींद्र बर्हाटे सह १३ जणांवर रो हाऊस हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:34 IST2020-09-03T13:33:37+5:302020-09-03T13:34:20+5:30
रवींद्र बर्हाटे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत ६ हून अधिक गुन्हे दाखल

रवींद्र बर्हाटे सह १३ जणांवर रो हाऊस हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
सावकारी व अनुसुचित जाती जमातीखाली गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दमदाटी करुन मालमत्ता हडपसर केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे व त्यांच्या टोळीतील १३ जणांवर हडपसरपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. रवींद्र बर्हाटे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत ६ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रवींद्र बर्हाटे शैलेश जगताप, विशाल ढोरे, विनोद ढोरे, अस्लम पठाण, सुजितसिंह, बालाजी लोखंडे, सचिन धीवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, देवेंद्र जैन, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रवींद्र बर्हाटे हे अजूनही फरार आहेत.
याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधि़ ३९, ४५ आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देठे यांचा मांजरी ग्रीन येथे बंगला असून त्यांचे एक हॉटेल आहे. हा सर्व प्रकार जून २०१७ ते जून २०२० दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांच्यावर एका फायनान्स कंपनीचे ८० लाख रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी फायनान्स कंपनीकडून तगादा लावला जात होता. आरोपींनी देठे यांचा मांजरी ग्रीनमधील रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी कट रचला. आरोपींनी त्यांना २५ लाख रुपये महिना ५ टक्के व्याजाने कर्ज दिले. त्यांनी त्यातील आतापर्यंत सव्वा अकरा लाख रुपये परत केले. तसेच त्यांच्या हॉटेलवर निवडणुक काळात त्यांनी जेवण वगैरे करुन ४ ते ५ लाख रुपयांचे बील केले. कर्जाची वसुल करण्यासाठी त्यांनी फिर्यादीस उपद्रव देणे सुरु केले. त्यांची मालमत्ता जबरदस्तीने त्यांचे नावावर करुन घेण्यासाठी फिर्यादी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तसेच ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी, त्यांची पत्नी यांचे फोटो, अंगठे व सह्या घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट दस्त तयार केला. त्यांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करुन अपशब्द वापरुन शिवीगाळ केली व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे अधिक तपास करीत आहेत.