Crime registered on NCP student leader in Nagpur | नागपुरात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यावर खंडणीचा गुन्हा
नागपुरात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यावर खंडणीचा गुन्हा

ठळक मुद्देसडक्या सुपारीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपारी व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पारडी पोलिसांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नागेश धनराज देडमुठे (रा. स्वागतनगर) असे त्यांचे नाव आहे.
नरेंद्र तुळशीराम दहीकर (वय ४८, रा. गोंडपुरा, बस्तरवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ते शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास संजय जयस्वाल यांच्या सुपारी गोदामाजवळ उभे होते. तेथे नागेश देडमुठे, राकेश जाधव, विक्की मेश्राम आपल्या साथीदारांसह आले. त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे सांगून तुमच्या गोदामात ठेवलेली सुपारी खराब आहे. त्याची कागदपत्रे तुमच्याकडे नाही. मी पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून ही सुपारी जप्त करायला लावतो, असे म्हणत गोदाम सील करण्याची धमकी दिली. कारवाई टाळायची असेल तर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हटल्याचे दहिकर यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून पारडी पोलिसांनी देडमुठे आणि साथीदारांविरुद्ध धाक दाखवून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला.

टोळीचा भंडाफोड कधी होणार
नागपुरात सडक्या सुपारीचा गोरखधंदा आणि त्याच्याशी जुळलेल्या वादावर लोकमतने अनेकदा प्रकाश टाकला आहे. इंडोनेशियातून आरोग्याला घातक असलेली ही सुपारी नागपुरात आणली जाते. सल्फरची भट्टी लावून त्यातून ही घातक सुपारी टणक आणि पांढरी केली जाते. तिची विक्री करून सर्वसामान्याच्या आरोग्याशी खेळणारी ही टोळी महिन्याला कोट्यवधी रुपये कमविते. या टोळीत अनेक गुंड आणि स्वत:ला राजकीय पक्षाचे नेते म्हणवून घेणारी काही गोडबोली मंडळीही सहभागी आहे. ते अधिकाऱ्यांनाही ब्लॅकमेल करतात. या टोळीचा भंडाफोड कधी होईल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Web Title: Crime registered on NCP student leader in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.