Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:24 IST2025-05-29T13:20:36+5:302025-05-29T13:24:42+5:30
लग्नाच्या पहिल्याच रात्री या तरुणीसोबत असं काही घडलं की,तिला आयुष्यभरासाठी मोठा धक्का बसला आहे.

Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खास क्षण असतो. लग्नानंतरची पहिली रात्र अर्थात मधुचंद्राच्या रात्री तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असते. मात्र, याच दिवशी एका तरुणीला इतका मोठा धक्का बसला की, तिचा लग्न आणि प्रेमावरून विश्वासच उडाला आहे. हा धोका तिच्या पतीनेच दिला असल्याने, ती आणखीनच हादरून गेली आहे. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी कायली नामक तरुणी आपल्या लग्नाची आणि मधुचंद्राची स्वप्न रंगवत होती, त्याचवेळी तिच्यासमोर धक्कादायक सत्य आले.
कायलीने ऑस्ट्रेलियाचा रेडिओ शो 'लेट ड्राईव्ह विथ बेन, लियाम अँड बेले'मध्ये आपबिती सांगितली. लग्नाच्या पहिल्याच रात्री बॉयफ्रेंड घरातून पळून गेला, तेव्हा तिच्यावर काय परिस्थिती बेतली होती, याचा खुलासा तिने यावेळी केला.
२४ तासही नाही टिकलं लग्न!
आपल्या आयुष्यातील ही घटना सांगताना कायली म्हणाली की, "माझं लग्न २४ तासही टिकलं नाही. आमचं लग्न एका भव्यदिव्य समारंभात झालं होतं. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. लग्नाच्या दिवशी आम्ही खूप फोटो काढले. सहा वर्षांच्या नात्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं होतं. मात्र, रिसेप्शनच्यानंतर अचानक माझा नवरा गायब झाला."
नेमकं काय झालं आणि आपला पती कुठे गेला, याची कायलीला अजिबातच कल्पना नव्हती. ती संपूर्ण रात्र कायलीने एकटी बसून त्याची वाट बघितली. कायलीने आपल्या पतीला फोन केला, मेसेजही केले. पण, त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. लग्नासाठी जमलेले सगळे नातेवाईक त्याच्याबद्दल विचारणा करत होते. तर, उत्तर देताना कायली मात्र गोंधळून गेलेली. या गोष्टीला काही महिने उलटल्यावर कायलीच्या समोर आपल्या पतीचं सत्य आलं, जे कळल्यावर तिला मोठा धक्का बसला.
पत्नीच्या बहिणीसोबत गेला पळून!
कायली म्हणाली की, तिच्यासोबत नात्यात असताना देखील तिचा पती दुसऱ्या महिलेला डेट करत होता. ही महिला दुसरी कुणी नसून आपलीच चुलत बहीण असल्याचे कळताच कायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर कायलीने पतीला घटस्फोट दिला. मात्र, आता लग्नाची भीती आयुष्यभरासाठी मनात बसल्याचे ती सांगते.