'ती' दिवसभर फोनवर बोलायची म्हणून पतीने काढला काटा; हत्या करून रचला बनाव, अशी झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:10 IST2021-11-16T15:09:50+5:302021-11-16T15:10:57+5:30
Crime News : पत्नी दिवसभर फोनवर बोलत असायची त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिची हत्या केल्य़ाचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

'ती' दिवसभर फोनवर बोलायची म्हणून पतीने काढला काटा; हत्या करून रचला बनाव, अशी झाली पोलखोल
नवी दिल्ली - उदयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. पतीनेच आपल्या पत्नीचा काटा काढला आणि नंतर सर्व बनाव रचला. याआधी देखील त्याने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा ती वाचली होती. पतीने दारू प्यायल्यानंतर महिलेची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पत्नी दिवसभर फोनवर बोलत असायची त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिची हत्या केल्य़ाचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पोलीस अधिकारी कमलेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पती दौलत सिंहने आपणच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, तो पत्नीसोबत घरात आधी दारू प्यायला. त्यानंतर दारूच्या नशेत तिच्या डोक्यात काठीने वार करून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. यासोबतच त्याने फोन देखील फ्लाइट मोडवरही ठेवला जेणेकरून लोकेशन ट्रेस होऊ शकले नाही. अधिकाऱ्यांनी गुरुवारी एका महिलेचा मृतदेह खड्डात पडल्याची माहिती मिळाली होती. गोगुंदा पोलिसांनी कसून तपास केला असता हे हत्या प्रकरण असल्याचं समोर आलं.
हेमाच्या चारित्र्यावर होता संशय
हेमा चौहान असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी पतीची चौकशी केली. मात्र ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी हायवेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेह मिळाल्याच्या एक दिवस आधी रात्री पती दौलत सिंह कारमधून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी दौलतला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याचा स्वीकार केला आहे. तपासात समोर आलं आहे की, दौलत सिंह बऱ्याच काळापासून हेमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हेमा खूप वेळ फोनवर लोकांशी बोलायची. त्यामुळे पतीचा संशय बळावला.
पतीने आपला गुन्हा केला कबूल
अनेकवेळा दौलतने हेमाला बेदम मारहाणही केली. दौलतने पत्नीची हत्या केल्यानंतर कोणालाही शंका येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता पतीने आपला गुन्हा कबूल केला आणि कट कसा रचला याबाबत माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.