Crime News: राजस्थानमधील घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती, शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:12 IST2022-08-18T17:10:08+5:302022-08-18T17:12:20+5:30
Crime News: राजस्थानमधील जालोर येथे शिक्षकाच्या मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Crime News: राजस्थानमधील घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती, शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
लखनौ - राजस्थानमधील जालोर येथे शिक्षकाच्या मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्याला एवढी बेदम मारहाण केली की, त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मिळत असलेल्या माहितीनिसार मृत विद्यार्थ्याचं नाव बृजेश विश्वकर्मा असं होतं. त्याचं वय केवळ १० वर्षे एवढं होतं. हे प्रकरण सिरसिया पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावामधील आहे. येथे एका खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबामध्ये शोकाचे वातावरण आहे. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी बहराइच येथे पाठवण्यात आले आहे.
हल्लीच राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील एक खासगी शाळा सरस्वती विद्या मंदिर येथे तिसरीत शिकणाऱ्या इंद्र मेघवाल याचा शिक्षकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. मृत विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याच्या मडक्याला हात लावल्याने शिक्षकाने त्याला मारहाण केली होती. त्यानंतर अहमदाबादमधील एका रुग्णालयात शनिवारी त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय शिक्षक चैल सिंह याला अटक केली होती, तसेच त्याच्यावर हत्या आणि एसटीएसटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणार राजकारणही होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जालौरचे जिल्हाधिकारी निशांत जियान आणि एसपी हर्षवर्धन अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुलावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.