नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर फक्त 15 दिवसांत दागिने, पैसे घेऊन नववधू झाली पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:12 IST2022-02-13T15:09:53+5:302022-02-13T15:12:46+5:30
Crime News : वधू लग्नानंतर 15 दिवसांनी दागिने घेऊन फरार झाली आहे. या घटनेनंतर वरासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

फोटो - आजतक
नवी दिल्ली - राजस्थानच्या बाडमेर (Rajasthan Barmer) जिल्ह्यात पुन्हा एकदा लुटारू नववधूची टोळी सक्रिय झाली असून एका तरुणाला जाळ्यात अडकवलं आहे. एका दलालाने गुजरातमध्ये राहणाऱ्या विवाहितेचे एका तरुणाशी लग्न लावून तीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही वधू लग्नानंतर 15 दिवसांनी दागिने घेऊन फरार झाली आहे. या घटनेनंतर वरासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील भीमडा येथील रहिवासी मेहराराम यांनी 4 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मेहराराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेजारी राहणारा जोगाराम याने काही महिन्यांपूर्वी लग्न करून देण्याचे म्हटलं होतं. त्याबदल्यात तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर 24 नोव्हेंबर 2021 रोजी तो दलाल तरुणीसोबत बाडमेर येथे आला आणि कोर्टात लग्न केले. यानंतर पीडित तरुणाने जोगारामसह अन्य दोघांना तीन लाख रुपये दिले. बाडमेरमध्ये कोर्टात लग्न झाल्यानंतर मेहरा राम ममता नावाच्या वधूला आपल्या गावी घेऊन गेला. तिथे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.
तरुणाने सांगितले की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्व काही ठीक चालले होते. सुमारे 10 दिवसांनंतर नववधू ममताने कोणत्यातरी बहाण्याने 40 हजार रुपये तिच्या भावाच्या खात्यात जमा करायला सांगितले. तसेच त्याने सांगितले की, डिसेंबर महिन्यात तो कामासाठी गेला होता, तेव्हा वधू ममता दागिने आणि 50 हजार रुपये घेऊन फरार झाली. परत आल्यावर ममता घरी न दिसल्याने त्याने तिला फोन केला. त्यावर तिने आईची प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं. 15 ते 20 दिवसांत परत येणार असल्याचं म्हटलं.
तरुणाला संशय आल्यानं त्याने दलालाशी बोलणंही केले, मात्र तोही उत्तर देत नव्हता. वधूला वारंवार फोन करून ती कधी येणार असे विचारले असता तिने सांगितले की, तिचे आधीच लग्न झाले आहे, तिला एक मूलही आहे. हे ऐकून मेहरारामला धक्काच बसला. याप्रकरणी पोलीस तपास अधिकारी इंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. दलाल जोगाराम आणि इतरांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून लग्न करण्याचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.