Crime News: नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह माहेरच्या घरातील अंगणात पुरला, असा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:27 IST2022-07-02T12:26:45+5:302022-07-02T12:27:44+5:30
Crime News: एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेह माहेरी घरासमोरील अंगणात खड्डा खोदून पुरला. दरम्यान, पतीच्या व्यसनाधीनतेला वैतागून हे कृत्य केल्याचे पत्नीने म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News: नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह माहेरच्या घरातील अंगणात पुरला, असा झाला उलगडा
लखनौ - उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेह माहेरी घरासमोरील अंगणात खड्डा खोदून पुरला. दरम्यान, पतीच्या व्यसनाधीनतेला वैतागून हे कृत्य केल्याचे पत्नीने म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सासरी गेलेल्या युवकाने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर रोजची मारहाण आणि पतीच्या व्यसनाधीनता यामुळे त्रस्त होऊन पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने घरासमोरील अंगणात चार फूट खोल खड्डा खणून त्यात पतीचा मृतदेह पुरला.
दोन दिवसांपासून मुलगा बेपत्ता असल्याने आईने पोलिसांकडे तपासासाठी विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या सासरच्या मंडळींवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत तपासातील सत्य समोर आणले.
पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच मृत ओम प्रकाशची पत्नी सावित्री हिने तिचा गुन्हा कबूल केला. तिने दाखवलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह तिने घरासमोरील अंगणात पुरला होता.