Crime News : माजी नगरसेवकाच्या भावाचा बारमध्ये धिंगाणा, मॅनेजरला बंदूक दाखवून गुंडागर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:59 IST2021-10-19T17:49:50+5:302021-10-19T17:59:39+5:30
Crime News : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केलीय. विशेष बाब म्हणजे यात एका माजी नगरसेवकाच्या भावाचादेखील समावेश असल्याचं समजतंय.

Crime News : माजी नगरसेवकाच्या भावाचा बारमध्ये धिंगाणा, मॅनेजरला बंदूक दाखवून गुंडागर्दी
कल्याण - कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून लेडीज सर्व्हिसबारचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कल्याण शीळ रोड डान्सबारमुळे बदनाम असताना आता कल्याण पश्चिमेतील एका बारमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धिंगाणा घालण्यात आलाय. बार सुरू ठेवण्यावरून आणि बिल भरण्याच्या मुद्दयावरून ही राडेबाजी करण्यात आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केलीय. विशेष बाब म्हणजे यात एका माजी नगरसेवकाच्या भावाचादेखील समावेश असल्याचं समजतंय.
मंगलसिंह चौहान, रिकीन गजार, उत्तम घोडे, हरीश्याम कन्हैया, विक्रांत बेलेकर, शेखर सरनौबत अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावं असून यापैकी उत्तम घोडे हा ठाणे ग्रामीण पोलीस विभागात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. हे सहा जण सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ताल बारमध्ये जेवणासाठी आणि दारू पिण्यासाठी गेले होते. जेवण आणि दारू मिळून एकूण 16 हजार 320 रुपये बिल झालं. यावेळी मॅनेजरच्या टेबलवर रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आली. इतक्यात मॅनेजर राजकिरण जाधव यांनी बार बंद झाल्याची घोषणा माईकवरून केली. याचा राग आल्यानं या सहा जणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मॅनेजरला दमदाटी करत बार सुरू ठेवा अशी धमकी दिली. बारच्या बाहेरसुद्धा राडा करत अन्य एका कर्मचाऱ्यासह बारमालक द्वारेश गौडा यांना धक्काबुकी व शिवीगाळ करण्यात आली. पैसे आणून बिल भरतो पण बार बंद करू नका, असे सांगत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून खुलेआम अनुचित प्रकार घडत असून या प्रकरणात एका माजी नगरसेवकाचा भाऊदेखील असल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आलंय.