सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:53 IST2025-10-24T09:49:18+5:302025-10-24T09:53:25+5:30
Crime News Chinchwad: नकुल भोईर हे सामाजिक कार्यात सक्रिय होते. ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी होते, ज्यामुळे या घटनेने स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
पुण्याजवळील चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पती सारखा चारित्र्यावरून संशय घेत असल्याने पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे.
चिंचवडमधील माणिक कॉलनी लिंक रोड परिसरातील ही घटना आहे. मयत पतीचे नाव नकुल आनंद भोईर (वय- ४०, रा. माणिक कॉलनी लिंकरोड, चिंचवड) असे असून पत्नीचे नाव चैताली नकुल भोईर असे आहे. पहाटे ०२.३० ते ०२.४५ वाजेच्या दरम्यान चैतालीने नकुलचा खून केला आहे.
आरोपी पत्नी चैताली भोईर हिने पती नकुल भोईर यांचा कपड्याने गळा आवळून खून केला. प्राथमिक माहितीनुसार, मयत नकुल आनंद भोईर हे आरोपी पत्नी चैताली भोईर यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होते. यातूनच दोघांमध्ये वाद होत असत. हा वाद विकोपाला जाऊन चैताली यांनी पतीचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मयत व्यक्तीची ओळख
मयत नकुल भोईर हे सामाजिक कार्यात सक्रिय होते. ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी होते, ज्यामुळे या घटनेने स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चिंचवड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पत्नी चैताली भोईर यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या खुनाच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.