Crime News : काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका निळ्या ड्रममध्ये पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन टाकल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली होती. आता असेच एक प्रकरण राजस्थानमधून समोर आले आहे. येथील अलवरजवळील एका घराच्या छतावर एका पुरूषाचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये आढळला. या प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली. पत्नी, तीन मुले आणि घरमालकाचा मुलगा बेपत्ता आहेत.
या घटनेतील मृताचे नाव हंसराम उर्फ सूरज असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. तो त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसह खैरथल तिजारा येथे राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराज सुमारे दीड महिन्यांपासून आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. तो एका वीटभट्टीवर काम करत होता.
घरमालकाच्या मुलासोबत पत्नीची अनैतिक संबंध होते
मिळालेल्या माहितीनुसार, हंसराज दारू पित होता. त्याची घरमालकाचा मुलगा जितेंद्रशीही मैत्री झाली होती. जितेंद्र अनेकदा त्याच्या घरात येत होता. अचानक हंसराजच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली त्यावेळी शेजारच्यांना संशय आला. नंतर कळले की छतावर ठेवलेल्या ड्रममधून वास येत आहे, याची माहिती पोलिसांना दिली.
ड्रम मीठाने भरला होता
पोलिसांनी घटनास्थळी तपास केला त्यावेळी हंसराजचा मृतदेह ड्रममध्ये आढळला. मानेवर धारदार शस्त्राच्या खुणा आहेत. गळा चिरून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. नंतर त्याचा मृतदेह ड्रममध्ये मीठ भरून टाकण्यात आला. हंसराजची पत्नी, त्याची तीन मुले आणि घरमालकाचा मुलगा बेपत्ता आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर येत असल्यामुळे पतीची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.
पोलिसांनी शोध सुरू केला
पोलिसांनी बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध सुरू केला. संशयीत आरोपी समोर आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.