दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार
By सदानंद सिरसाट | Updated: August 28, 2022 21:36 IST2022-08-28T21:35:29+5:302022-08-28T21:36:08+5:30
रिक्षा-दुचाकीची धडक, दोन प्रवाशी गंभीर जखमी

दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार
खामगाव : खामगाव तालुक्यातील वाघळी येथून दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरजगाव देशमुख-कंझारा दरम्यान शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या दरम्यान घडली. यावेळी रिक्षातील दोन प्रवाशी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले. तर रिक्षाचालक फरार असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील टेंभूर्णा येथील रहिवासी असलेला संदिप गजानन वसतकार (२४) हा दुचाकीने वाघळी येथे दर्शनासाठी गेला होता. परतीच्या मार्गावर असताना त्याची दुचाकी क्रमांक एमएच-३०, एई-९९०७ ची रिक्षा क्रमांक एमएच-२८, एच-२३४१ सोबत धडक झाली. धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रिक्षा कंझारा येथील प्रवाशी घेऊन गावाकडे जात होता. त्यामध्ये मंदा प्रल्हाद वैतका, अ.शफिक अ. मजिद जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. घटनास्थळावरून रिक्षाचालक फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास गोंधनापूर बीटचे सहाय्यक उपनिरिक्षक एस.बी.देव करीत आहेत.