crime in madhya pradesh gang rape with 15 year old minor in khargone | माणुसकीला काळीमा! हाथरसनंतर मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

माणुसकीला काळीमा! हाथरसनंतर मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नवी दिली - हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. हाथरसनंतर आता मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. झिरन्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, झिरन्यामध्ये तीन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. बाईकवरून तीन आरोपी मारूगड गावात आले होते. रात्री पाणी पिण्यासाठी ते शेतात असलेल्या एका घरात गेले. मुलीच्या भावाला मारहाण करून त्यांनी मुलीला पळवून नेलं.

मुलीची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला रस्त्यावर फेकून देत आरोपी फरार झाले आहेत. पीडित मुलीच्या भावाने घटनेनंतर याबाबतची माहिती ही नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

"शिवराज सरकार झोपेतून कधी जागं होणार?", काँग्रेसचा हल्लाबोल 

मध्य प्रदेशमधील या बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे. 'शिवराज सरकार झोपेतून कधी जागं होणार आणि या अशा घटना थांबणार?' असं म्हणत काँग्रेसने निशाणा साधला आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

English summary :
crime in madhya pradesh gang rape with 15 year old minor in khargone

Web Title: crime in madhya pradesh gang rape with 15 year old minor in khargone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.