CoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 19:36 IST2020-03-31T19:34:08+5:302020-03-31T19:36:52+5:30
CoronaVirus Lockdown : होटगी गावातील घटना : आईला औषध आणण्यासाठी जाताना घडला प्रकार

CoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर
सोलापूर : आईला औषध घेऊन येण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला होटगी येथे आडवण्यात आले. पोलीस आहे असे सांगत असतानाही एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी हरिकृष्ण भागवत चोरमुले (वय 35 रा. होटगी स्टेशन ता. दक्षिण सोलापूर) हे जखमी झाले आहेत. ही मारहाण रविवारी सायंकाळी 6.30 वाजता झाली.
हरिकृष्ण चोरमुले हे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. साप्ताहिक सुट्टीनिमित्त हरिकृष्ण चोरमुले हे होटगी येथील गावच्या घरी गेले होते. घरी आई आजारी असल्याने तिला औषध आणण्यासाठी सायंकाळी घराच्या बाहेर पडले.
मोटारसायकलवरून ते होटगी गावाच्या कॉर्नर जवळ आले असता, तेथे उभे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आडवले. हरिकृष्ण चोरमुले यांना अधिकाऱ्याने काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हां पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांनी मी पोलीस आहे. असे सांगत असतानाही त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत हरिकृष्ण चोरमुले हे जखमी झाले, ते खाली पडले. त्यांना जागेवर सोडुन अधिकारी गाडीत बसुन निघुन गेले.
पोलीस अधिक्षक यांच्याकडे दिली तक्रार : हरिकृष्ण चोरमुले
मी पोलीस आई असे सांगुनही अधिकारी ऐकत नव्हते, त्यांनी काठीने बेदम मारहाण केली. जा तुला कुठे जायच ते जा माझ्यावर केस कर असे म्हणत मला मारहाण करून निघुन गेले. माझ्या हाताचे तीन बोेटे फ्रॅक्चर झाली आहेत. याची फिर्याद देण्यासाठी मी वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी तक्रार घेतली नाही. या प्रकरणी मी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सिव्हिल पोलीस चौकीत नोंद...
जखमी आवस्थेत पोलीस कर्मचारी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल झाले. सिव्हिल पोलीस चौकीत पोलीस उपअधिक्षक (डीवायएसपी) संतोष गायकवाड यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे.