रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:40 IST2025-06-03T06:39:37+5:302025-06-03T06:40:47+5:30
कासलेने न्यायालयाच्या बाहेरच्या आवारात महायुती सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी

रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कासलेला मुंबई पोलिसांनी दिल्लीमध्ये अटक केली होती. त्याच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल होता, त्यानंतर मुंबईत देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे व राजकीय नेत्यांविरोधात केलेल्या आरोपांप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कासलेंचा उद्देश तपासण्यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
न्यायालयाबाहेर कासलेची सरकारविरोधात घोषणा
कासले सुरुवातीपासून पोलिसांना सहकार्य करत असल्याने त्याला पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद कासलेचे वकील नवनाथ देवकते यांनी केला. कासलेने जे आरोप केले आहेत ते खरे आहेत की खोटे, ते तपासा आणि नंतर कारवाई करा, केवळ आरोप केले म्हणून अटक कशी करता येईल. त्यामुळे ही अटक बेकायदा असल्याचे सांगत वकिलांनी त्याचा जामीन अर्ज दाखल केल्याची माहितीही दिली. न्यायालयातून बाहेर जाताना कासलेने इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशी घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.