"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:55 IST2025-07-28T08:54:45+5:302025-07-28T08:55:23+5:30
सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने रडत रडत तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कॉन्स्टेबलच्या पत्नीने तिच्या सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने रडत रडत तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. तसेच तिच्या सासरच्या लोकांवर, पतीवर आणि नणंदेवर गंभीर आरोप केले. महिलेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही विनंती केली की, "मी मरत आहे पण योगीजी या लोकांना सोडू नका." महिलेचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सौम्या कश्यपने रविवारी खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सौम्याच्या कुटुंबाला या प्रकरणाची माहिती दिली आहे. कुटुंबाने लेखी तक्रार दिल्यानंतरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. सौम्याचा पती कॉन्स्टेबल अनुराग सिंह लखनौच्या बीकेटी पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी सौम्या एक व्हिडीओ बनवला आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण केल्याचा आरोप केला, ती म्हणाली की, हे लोक माझ्या पतीचं पुन्हा लग्न करत आहेत. हिने काहीही आणलं नाही, हिला मारून टाका असं म्हणतात. महिलेने रडत रडत विनंती केली की, जर मी मेली तर मी योगीजींना हात जोडून प्रार्थना करते की, या लोकांना सोडू नये. या लोकांकडे पैसे आहेत आणि ते काहीही करू शकतात. आम्ही मुली कुठे जाऊ आणि काय करू. आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही.
सौम्याने तिच्या पतीवर आरोप केला आणि म्हणाली की, तो मला मारहाण करतो आणि म्हणतो की मी पोलिसात आहे, तू माझं काहीही करू शकत नाही. मी या लोकांमुळे जीव देत आहे. त्यांना सोडू नका. एडीसीपी उत्तर जितेंद्र दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बीकेटी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मामपूर बाणा गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका कॉन्स्टेबलच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच, प्रभारी निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि महिलेच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे. तसेच फील्ड युनिटला बोलावण्यात आलं आहे आणि फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. या प्रकरणात आवश्यक माहिती गोळा केली जात आहे.