सांगलीत जमावाला पांगविण्यासाठी काँग्रेस नगरसेवकाचा हवेत गोळीबार!

By शीतल पाटील | Published: June 4, 2023 05:21 PM2023-06-04T17:21:55+5:302023-06-04T17:23:05+5:30

याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा करण्यात आला असून पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

Congress corporator fired in the air to disperse the crowd in Sangli! | सांगलीत जमावाला पांगविण्यासाठी काँग्रेस नगरसेवकाचा हवेत गोळीबार!

सांगलीत जमावाला पांगविण्यासाठी काँग्रेस नगरसेवकाचा हवेत गोळीबार!

googlenewsNext

सांगली : शहरातील सिव्हिल रुग्णालय परिसरात काँग्रेस नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. दोन मुलांच्या वादात पडल्याच्या कारणातून तरुणांच्या टोळक्याने नगरसेवक मयूर पाटील यांच्या हॉटेल आणि गाडीवर शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यावेळी हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी पाटील यांनी दोन राउंड हवेत गोळीबार केला. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा करण्यात आला असून पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

शासकीय रुग्णालयासमोरील गल्लीत नगरसेवक पाटील यांचे हॉटेल आहे. जेवण करून पाटील हॉटेलसमोर शतपावली करत होते. यावेळी एका मेडिकल दुकानासमोर दोन मुले आपापसात भांडणे करत होती. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी पाटील गेले असता त्यातील एकाने त्यांची कॉलर धरून तु आमच्यामध्ये का पडला आहेस असे म्हणत धारदार हत्यार काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. माफी मागून प्रकरणावर पदडा टाकण्यात आला. मयुर पाटील घरी आले असता त्यांना दूरध्वनीवरून त्यांना दोघांनी घटनेबाबत जाब विचारला. 

पाटील यांनी आपण सकाळी बोलू, अशी विनंतीही केली. रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलसमोर येऊन तरुणांच्या टोळक्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी याची माहिती पाटील यांना दिले. पाटील परवानाधारी विदेशी बनावटीची रिव्हॉल्वर घेऊन हॉटेलकडे धावले. हॉटेलजवळ गेले दोन अल्पवयीन मुलांनी आम्हाला मारले आहे, त्यांना सोडू नका असे म्हणत लोखंडी रॉड, चाकू आणि दगडे घेऊन पाटील यांच्या दिशेने आली. यावेळी त्यांनी रिव्हॉल्वरमधून एक राउंड हवेत गोळी झाडली. यावेळी जमावाने पुन्हा हॉटेलच्या दिशेने दगडफेक केली. 

पाटील आणि कामगार हॉटेलमध्ये गेले. विशाल कलगुटगी या कर्मचाऱ्याला जमावाने पकडून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पाटील यांनी पुन्हा एक राउंड हवेत गोळीबार केला. सिव्हिल परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या बिट मार्शलना गोळीबाराचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून राडा घालणारा जमाव तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. सांगलीत गोळीबार झाल्याच्या घटनेने शहर हादरून गेले.

Web Title: Congress corporator fired in the air to disperse the crowd in Sangli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.