'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:41 IST2025-10-07T09:40:21+5:302025-10-07T09:41:35+5:30
रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

AI Generated Image
रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. पत्नीच्या विरहाने आणि वारंवार बोलावूनही ती परत न आल्याने आलेलं नैराश्य यातून या पतीने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीपेट मंडलातील कोनापूर गावातील गोरकांति स्वामी यांचा विवाह चार वर्षांपूर्वी मल्लूपल्ली येथील सिरिशा यांच्यासोबत झाला होता. गोरकांति हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लग्नाची पहिली काही वर्षे दोघांचा संसार सुखात चालला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून सतत खटके उडत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून सिरिशा काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी मल्लूपल्ली येथे निघून गेली.
विरहाने ग्रासलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल
पत्नी माहेरी गेल्यानंतर गोरकांति स्वामी यांनी तिला वारंवार घरी परत येण्यासाठी विनंती केली. मात्र, पत्नी सिरिशाने घरी परतण्यास नकार दिला. याच गोष्टीमुळे गोरकांति स्वामी गेले काही दिवस तीव्र नैराश्यात होते. पत्नी घरी परत न येणं त्यांना असह्य झालं होतं.
आपल्या मनातील ही वेदना सहन न झाल्याने, गोरकांति स्वामी यांनी पेड्डा मल्लारेड्डी गावातील सबस्टेशनजवळ धाव घेतली. तिथे एका झाडाला त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
पोलिसांकडून एफआयआर दाखल तपास सुरू
झाडाला गोरकांति स्वामी यांचा मृतदेह लटकलेला पाहताच गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही या दुर्घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, गोरकांति यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने कोनापूर गावातील लोकांना धक्का बसला आहे.