माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:14 IST2025-10-17T20:11:36+5:302025-10-17T20:14:30+5:30
Bengaluru Crime News: कॉलेजमधून येत असताना तरूणीला त्याने प्रपोज केलं, पण तिने नकार दिला

माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
Bengaluru Crime News: माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना २० वर्षीय मुलीसोबत घडली. बेंगळुरूमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एका तरूणाने हत्या केली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बेंगळुरूच्या पल्या परिसरातील रहिवासी असलेली २० वर्षीय यामिनी प्रिया एका खाजगी महाविद्यालयात बी.फार्माचे शिक्षण घेत होती. गुरुवारी पोलिसांना श्रीरामपुरा पोलिस स्टेशन परिसरात रेल्वे रुळाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना २० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला, तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर खोलवर जखमा होत्या.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही भयानक घटना घडली तेव्हा यामिनी कॉलेजमधून घरी परतत होती. श्रीरामपुरा पोलिस स्टेशन परिसरातील रेल्वे रुळाजवळ दुचाकीवरून आलेल्या एका तरूणाने तिला थांबवले आणि चाकूने तिचा गळा चिरला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.
पाठलाग करणारा कोण होता?
प्राथमिक पोलिस तपासात असे दिसून आले की खून करणारा संशयित यामिनीचा पाठलाग करत होता. तो त्याच भागातील असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना संशय आहे की त्याने काही दिवसांपूर्वी यामिनीला प्रपोज केले होते, पण तिने त्याला नकार दिला. यामुळे संतप्त होऊन तरूणाने तिची हत्या करण्याचा कट रचला. तरूणाला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांची कारवाई
यामिनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून आणि जवळच्या रहिवाशांच्या चौकशीवरून पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही सापडले आहेत.