Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी; कोण आहे फातिमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 12:14 IST2024-11-04T12:14:51+5:302024-11-04T12:14:51+5:30
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फातिमा खानला महाराष्ट्र एटीएसने उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं आहे.

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी; कोण आहे फातिमा?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाबा सिद्दिकी यांच्यासारखं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फातिमा खानला महाराष्ट्र एटीएसने उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं आहे. चौकशीत उघड झालं की, २४ वर्षीय फातिमाने आयटी विषयात बीएससी केलं असून तिची मानसिक स्थिती ठीक नाही. फातिमाला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात येत आहे.
रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणेच धोका असल्याची माहिती मिळाली होती. ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांत राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दीकींप्रमाणे त्यांना मारून टाकू, असंही लिहिलं होतं.
महाराष्ट्र पोलिसांना हा मेसेज मिळाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना लगेचच सतर्क करण्यात आले. सीएम योगींना मिळालेल्या या धमकीनंतर खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत तातडीने तपास सुरू केला. महाराष्ट्र एटीएस, ठाणे पोलीस आणि मुंबईच्या वरळी पोलिसांनी तपास सुरू केला.
एटीएसनेच महिलेचा पत्ता शोधून काढला. ही महिला उल्हासनगर येथे राहते, अशी माहिती समोर आली आहे. एटीएस तेथे पोहोचली असता ती मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचं दिसून आलं. नियमानुसार तिला स्थानिक पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
वरळी पोलिसांनी फातिमाची मानसिक प्रकृती ठीक नसल्याने तिला अटक केली नाही. तिची मानसिक तपासणी केली जाईल. फातिमाचे वडील व्यापारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा शिक्षित आहे, पण मानसिकदृष्ट्या ठीक नाही. तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी का दिली हे अद्याप समजू शकलेलं नाही.