नाशिकमध्ये सहावीतील विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; शिक्षक, मुख्यध्यापक निलंबित, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई
By संजय पाठक | Updated: February 8, 2025 18:13 IST2025-02-08T18:11:04+5:302025-02-08T18:13:16+5:30
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस

नाशिकमध्ये सहावीतील विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; शिक्षक, मुख्यध्यापक निलंबित, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई
संजय पाठक, नाशिक: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून भारत सर्व सेवा संघ, पाचेगांव ता. नेवासा जि. अहिल्यानगर संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थीनीसोबत मुख्यध्यापकाने वर्गशिक्षकाच्या मदतीने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. यानंतर तातडीने मुख्याध्यापक तुकाराम साबळे वर्गशिक्षक गोरख जोशी या दोघांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यानुसार संस्थेने कारवाई केली.
या प्रकरणातील दोषी शिक्षक व मुख्यध्यापकावर भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तातडीने मुख्याध्यापक तुकाराम साबळे, वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, आज इगतपुरी तालुक्यात असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेत दोन्ही आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. यानुसार कार्यवाही करत शिक्षक व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षक नाशिक यांना मंत्री भुसे यांनी दिले आहेत.