फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 14:57 IST2025-10-23T14:55:29+5:302025-10-23T14:57:27+5:30
जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथे सायंकाळच्या सुमारास घडली घटना

फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी
तुकाराम सर्जे, बोरी (जि. परभणी): दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २१ ऑक्टोबरला सायंकाळी आठच्या सुमारास फटाके वाजण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथे घडली. या घटनेमध्ये एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर नांदेड, परभणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणात एकूण दोन्ही गटातील २० जणांवर परस्पर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील नऊ आरोपींना अटक केल्याचीही माहिती बोरी पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घरासमोर फटाके वाजवण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये भांडणे झाली. भांडणाचे रूपांतर वादामध्ये झाले आणि जोराचे भांडण होऊन दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमध्ये नऊ जण जखमी झाले. ही माहिती बोरी पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही समाजातील नागरिकांची पोलिसांनी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची कुमक मागवून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
आरोपींनी हाणामारीत वापरलेले साहित्य जप्त करण्याचे काम बोरी पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमधील वीस जणांवर परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. विशाल डुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख तौकल शेख रहीम, शेख तौकीर शेख रहीम, शेख अरबाज शेख चांद पाशा, शेख नईम बडे मिया, शेख खय्यूम शेख जब्बार, शेख तारेक शेख तौकल, शेख उलफत शेख रसूल, शेख मगबुल शेख मेहबूब, शेख कलीम शेख रहीम, शेख मोसिन शेख अजीम, शेख महबूब शेख मगबुल, शेख साजिद शेख ताजिमिया यांच्यावर; तर दुसऱ्या गटातील शेख मोहसीन शेख आजम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण मुटकुळे, पांडुरंग गांजरे, रामा मुटकुळे, पिंटू मुटकुळे, शिवाजी मुटकुळे, धारू डुकरे, मारुती डुकरे, करण डुकरे त्यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर बोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.