आधार कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी केल्याचा दावा; डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:35 IST2025-07-24T09:32:09+5:302025-07-24T09:35:56+5:30
पवई परिसरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एकाला लाखोंचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांत २२ जुलै राेजी तक्रार दाखल केली आहे.

आधार कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी केल्याचा दावा; डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लाखोंचा गंडा
मुंबई : पवई परिसरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एकाला लाखोंचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांत २२ जुलै राेजी तक्रार दाखल केली आहे. खासगी मॅनेजमेंट कंपनीमधील कर्मचारी असलेल्या श्याम कुमार मुखर्जी (६९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जुलै रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला होता. त्या व्यक्तीने टेलिफाेन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत मुखर्जी यांच्या मोबाइल क्रमांक व आधार कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी करण्यात आल्याचा दावा केला.
त्यानंतर अन्य एका क्रमांकावरून फोन करून पुन्हा तीच माहिती देत तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे असे त्यांना सांगण्यात आले. तो कॉल दिल्लीच्या नेहरूनगर पोलिसांना ट्रान्सफर केल्याचा बनाव करण्यात आला. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर एका व्यक्तीने दिल्लीतील आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टबाबत कोणालाही सांगू नका असे सांगितले.
बँक खाते व्हेरिफिकेशनसाठी सेल्फ कस्टडी सुपरव्हिजन अकाउंटच्या नावाखाली ३.७० लाख रुपये पाठवण्यास सांगितले. ती रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याविरूद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.