पतीच्या डोळ्यादेखत पत्नीची हत्या, ६५ लाखांचे दागिने चोरीला; आरोपी पोलिसांसोबतच पाहत होता तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:48 IST2026-02-19T13:40:35+5:302026-02-19T13:48:56+5:30

बंगळुरुमध्ये महिलेची हत्या करुन दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Chilling Murder in Bengaluru Woman Slit Throat Next to Paralysed Husband Killer Stole 65 Lakh Gold | पतीच्या डोळ्यादेखत पत्नीची हत्या, ६५ लाखांचे दागिने चोरीला; आरोपी पोलिसांसोबतच पाहत होता तपास

पतीच्या डोळ्यादेखत पत्नीची हत्या, ६५ लाखांचे दागिने चोरीला; आरोपी पोलिसांसोबतच पाहत होता तपास

Bengaluru Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नेलमंगला भागात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी पीडित महिलेचा अर्धांगवायु झालेला पती तिच्या शेजारीच झोपलेला होता. मात्र आजारपणामुळे त्यांना या क्रूर घटनेची पुसटशी कल्पनाही आली नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेलमंगला येथील हिरापूर भागातील कोटे बिडी येथे ७० वर्षीय शोभा त्यांचे पती रंगनाथ यांच्यासोबत राहत होत्या. रंगनाथ हे गेल्या १५ वर्षांपासून अर्धांगवायूने ग्रस्त असून ते पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले आहेत. या दांपत्याला अपत्य नसल्यामुळे ते दोघेच घरी असायचे. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी डॉक्टरांनी फिजिओथेरपीसाठी घरी भेट दिली, तेव्हा शोभा यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या शेजारीच पती रंगनाथ पडून होते, त्यांना आपल्या पत्नीसोबत काय घडले आहे याची कोणतीही जाणीव नव्हती.

हत्येचा थरार आणि सीसीटीव्ही फुटेज

पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून शिवकुमार नावाच्या एका होलसेल दुकानदाराला अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पहाटे सुमारे १:०३ वाजता घरात घुसला. त्याने शोभा यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली आणि घरातील पैशांचा शोध घेतला. पैसे न सापडल्याने त्याने मृतदेहाच्या अंगावरील सोन्याची चेन, बांगड्या आणि इतर दागिने ओरबाडून नेले. चोरीला गेलेल्या एकूण ४५० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ६५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी गर्दीत सामील होऊन पाहत होता पोलिसांचा तपास

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी शिवकुमार पुन्हा घटनास्थळी आला होता. पोलीस जेव्हा पंचनामा आणि तपास करत होते, तेव्हा तो एका सामान्य प्रेक्षकासारखा गर्दीत उभा राहून सर्व हालचाली टिपत होता. कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून त्याने हा बनाव रचला होता.

असा लागला छडा

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एक व्यक्ती स्कूटरवरुन पळून जाताना दिसली. त्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी माग काढला आणि थेट शिवकुमारच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू, दुचाकी आणि आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Web Title : पति के सामने पत्नी की हत्या, लाखों के गहने चोरी; आरोपी देखता रहा जाँच।

Web Summary : बेंगलुरु: नेलमंगला में बुजुर्ग महिला की हत्या, पति बेखबर। 65 लाख के गहने चोरी। सीसीटीवी फुटेज से आरोपी शिवकुमार गिरफ्तार, जो पुलिस जाँच भी देख रहा था।

Web Title : Wife murdered before husband's eyes, jewelry stolen; killer watched investigation.

Web Summary : Bengaluru: Elderly woman murdered in Nelamangala, husband nearby unaware. Rs 65 lakh jewelry stolen. Accused Shivakumar arrested after CCTV footage revealed him fleeing. He even watched police investigation unnoticed.