अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देणं नडलं, नवरदेवासह पाचजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 20:27 IST2020-12-15T20:25:05+5:302020-12-15T20:27:02+5:30
Crime News : या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात नवरदेवासह एकूण पाच व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देणं नडलं, नवरदेवासह पाचजणांवर गुन्हा
वडनेर (वर्धा) : वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दित येणाऱ्या सेलू पारधी बेड्यावर अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात नवरदेवासह एकूण पाच व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सेलू पारधी बेडा येथील सुनंदा (काल्पनीक नाव) हिचा सोमवारी सेवाग्राम नजीकच्या मांडवगड पारधी बेडा येथील रहिवासी असलेल्या सुमीत (काल्पनीक नाव) याच्याशी विवाह लावून देण्यात आला. हा विवाह सोहळा संपन्न झाल्यावर महिला बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नवविवाहिता ही अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी केली. त्यानंतर कोल्ही खेकडी येथील ग्रामसेवक आशीष शेलकर यांनी चौकशी केल्यावर नवविवाहिता ही अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने वडनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर तसेच मुलीच्या आई-वडिलाविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक काद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात वडनेर पोलीस करीत आहेत.